July 25, 2010

23 मे- तिलालोटणी

सकाळी उठल्यावर आमच्यातील काही बायकांनी रात्री अस्वलं आल्याचे सांगितले मला ते काही खर वाटलं नाही, आम्ही जोशी मंडळीनी आवरल आणी पुढच्या वाटचालीसाठी सज्ज झालो. आजचा प्रवास ११००० फुट झिरमि ते १२५०० फुट तिलालोटणी असा होता, सारपास पासून आता आम्ही फक्त १ कॅम्प दूर होतो. जसजस वर जात होतो तसतसा प्रवासाचा थकवा लवकर जाणवत होता, आधी ज्या वेगाने, किवा सलग जेवढा वेळ मी चालायचो, तेवढ या प्रवासात जमल नाही, कारण ऑक्सिजन पटली कमी होत असल्याने श्वसन करणे थोडे कठीण असते. हवेत पण कमालीचा गारवा होता, झिरमि सोडल्यावर हिमालयीन वातावरणाचा खरा फील मला आला. जसजसे वर जात होतो तसतसा सारपास जवळ जवळ येऊन आम्हाला खिजवत होता. आजूबाजूचे इतर सुळके आता खुजे वाटत होते, पण सारपास पाहायला अजूनही मान वर करावी लागतच होती(उगाच त्याला सारपास म्हणत नाहीत). बरेच चढ उतार पार करत ४ च्या सुमारास ‘तिलालोटणी’ कॅम्प वर पाउल टाकले. “अब हम मंजील के बहुत करीब थे”. तिलालोटणी कॅम्प हा उंच टेकडीवर उभा केलेला होता, आजूबाजूला नुसती हिरवळच होती, ती साईट मला (डिस्कवरी वर बघितलेल्या)लेह-लडाख च्या वातावरणाची आठवण करून देत होती. खडकाळ जमीन, त्यावरील अप्रतिम हिरवळ, उंच पर्वतसुळके, आणी टिपिकल हिमालयीन मंगोलियन वंशाच्या लोकांची वस्ती, दगडाच्या चीपोऱ्या रचून बांधलेले त्यांचे विशिष्ट मंदिर, सुसाट वेगाने वाहणारा वारा, आणी त्यातील झोंबणारा गारवा, एक वेगळेच अदभूत विश्व होते. तेथील गाईड ने आम्हाला त्या मंदिराच्या दिशेकडे न जाण्यास सांगितले. आम्ही जोशी ग्रुप ने मग एक फोटो सेशन केले. तिलालोटणी वर एक त्रास म्हणजे शौचालय हे एका भल्यामोठ्या उताराच्या पायथ्याशी होते,(जवळपास माझ घर ते बोडस कार्यालय एवढ अंतर). तो चढ चढणे फारच त्रासदायक काम होते. गाईड ने आम्हाला सूचना दिली, त्या रात्री कॅम्प फायर होणार नाही, कारण सारपास लं निघायला त्या दिवशी पहाटे २.३० ला उठायचे आहे. त्या दिवशी हिमालयीन थंडी ने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. आम्ही पोहचलो तेव्हाच १० डिग्री तापमान होत. रात्री कदाचित २-३ पर्यंत सहज गेल असेल, तोंडातून नुसत्या वाफा निघत होत्या त्या दिवशी. खर तर इतके दिवस माझ्या जड सामानाच मुख्य कारण म्हणजे पुण्याहून आणलेले भलेमोठे थंडीचे कपडे, पण आतापर्यंत एवढी विशेष थंडी न जाणवल्याने मी फक्त jacket वर होतो. पण त्या दिवशी मला स्वेटर, अजून एक jacket, मफलर(जे आतापर्यंत माझ असलेल मंदार वापरत होता, ते मे आज मागून घेतल). एवढे वस्त्रालंकार परिधान करून रात्री स्लीपिंग बॅग मध्ये blanket घेऊन झोपलो.

२४ मे सारपास- बिस्केरी थाच

सकाळी २.३० ला उठलो, तेव्हा वातावरण कमालीचे गार होते, अजिबात उठवत नव्हते, शरीर दगडासारखे झाले होते, कसबस सगळ आटपल. त्या दिवशी मी नाश्ता केला नाही(रात्री ७.३० लं जेवल्याने, आणी उपम्याच्या नावाखाली खीर पहिल्याने खायचा मुडच गेला). आज खरी कसोटी होती, “अब हम असली मैदान मे उतरे थे”. नजर फक्त सारपास वर होती. साधारण ५ वाजता आम्ही निघालो, सूर्य हळूहळू वर येत होता, आजचा रस्ता प्रचंड चढाचा होता. सारखी धाप लागत होती, आम्ही बर्फाच्छादित प्रदेशाकडे कुच करत होतो. बर्फ बघायला डोळे आसुसलेले होते कधीचे(मुंबईत बाप जन्मात पाहिलं नसल्याने). आज आमच्यासाठी युथ होस्टेल ने खास शेर्पा जमातीचे गाईड नेमलेले होते जे बर्फाच्छादित प्रदेशात सराईतपणे वावरतात(आपण मुंबईत रेल्वे स्टेशन वर पण वावरत नाही इतक्या सफाईने हे बर्फात चालतात). एका पोईंट ला पोहोचल्यावर आम्हाला दुरवर लांबच लांब पसरलेलं बर्फ दिसल. आणी सारपास आता काहीच अंतर दूर होता. खर तर मी डोंबिवलीतच ठरवलेल होत कि एक भगवा झेंडा घेऊन जायचा इकडून आणी तिकडे रोवायचा, पण तो काही मिळाला नाही(काय बाळासाहेब, राजसाहेब, डोंबिवलीत भगवा उपलब्ध झाला नाही). मला काही करून तो रोवायचा होता. उत्तर भारतात मला भगवा मिळणं फारच अशक्यप्राय होत. मी आमच्यातल्या बऱ्याच जणांकडे भगव्या रंगाच्या कापडासाठी चौकशी चालू केली होती अगदी पहिल्या दिवसापासून, पण कुणाकडे काही मिळत नव्हत. त्या दिवशी पण माझा भगव्या कापडाचा शोध चालूच होता.

सारपास जेमतेम तास-दिडतासावर ठेपला होता. बर्फात चालता चालता सहज मी पंजाबदा शेर अर्जीन्दार उर्फ सोनू याला सहज विचारले भगव्या कापडाविषयी(त्या दिवशी मला काहीही चालल असत, ओढणी, टोवेल अगदी napkin पण चालला असता). तर त्याने लगेच मला त्याचा डोक्याला बांधायचा भगवा रुमाल काढून दिला(त्याला सुद्धा मराठी मातीशी इमान होतं, मुंबईचा होता, बघा मराठी माणसानो). भगवा पाहिल्यावर माझा बारा वाजेलेला चेहरा जो काही खुलला आणी अंगात कुठून एक प्रकारचा जोर आला(जस गाडीत एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल भरल कि गाडी मध्ये जान येते), मी प्रसाद आणी माझ्या इतर सवंगड्याना हाक मारत अक्षरश पळत सुटलो. प्रसाद माझ्या नजरेच्या रेंज मध्ये दिसला, अक्षरश पळत जाऊन त्याला मी भगव कापड दाखवलं. त्याचा चेहरा पण प्रचंड खुलला, नंतर प्रदीप आला, त्याला पण प्रचंड आनंद झाला भगवा पहिल्याने. मग आम्ही सर्वानी एक काठी घेऊन त्या भोवती भगव कापड गुंडाळून त्याचा अगदी व्यवस्थित ‘भगवा झेंडा’ केला. आणि एकदाचे सारपास पाशी पोहोचलो. वास्तविक सारपास शिखराच्या टोकावर जायला बर्फाचा मोठा चढ पार करायचा होता, पण गाईड ने सांगितले तुम्हाला हव तर जाऊ शकता, मी आणी प्रसाद धैर्य करून बऱ्याच उंचावर गेलो भगवा घेऊन आणि तिकडे भगवा रोवला बर्फात. जेव्हा बर्फात चढ चढण अगदीच अशक्य झालं, तेव्हा सारपास च टोक काहीच अंतरावर होत, पण जाण शक्य नव्हत. मी धडपडत, आपटत आटोकाट प्रयत्न करत होतो वर जायचा पण काही जमल नाही आणी प्रसादने पण न जाण्याचा सल्ला दिला तो मी नाईलाजाने ऐकला. आम्ही भल्यामोठ्या चढाच्या टोकावर होतो. सरळ चालत उतरण बर्फातून शक्यच नव्हत. शेवटी मी आणी प्रसाद ने बर्फातून स्लाईड केली आणी पाय्थ्याशी आलो. तो पर्यंत ‘रंगीन पांडा’ ग्रुप ची बाकी मंडळी हजार झाली. तिकडे सर्व बर्फात स्लाईड करू लागले, आपल्या मराठी मंडळी मधील सोमण काका, संतोष, कविता-नेहा यांनी देखील भगव्या बरोबर फोटो काढून घेतले. मग ब्रेक झाल्यावर निघायच्या वेळी मी प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की अशी जोरदार घोषणा दिली आणी सर्वानी नंतर एकसुरात जय म्हणत तो परिसर दणाणून सोडला.

सारपास ला पाय लावून आल्यावर आम्हाला बिस्केरी कॅम्प गाठायचा होता, जो माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रवास होता. जस सारपास वरून आम्ही बर्फात पुढे चालत होतो, तर समोर दिसला अत्यंत अरुंद असा बर्फाचा रस्ता, खाली भलामोठा बर्फाने भरलेला उतार, त्या अरुंद वाटेत पाय सटकला जर बर्फात तर माणूस उतारावर किमान ५० एक फुट खाली स्लाईड होतो(आमच्यातील सोमण काका, जुमाना,नरेन हे खाली स्लाईड झालेच). अत्यंत बिकट अशी वाट होती ती, मध्येच पाय बर्फात खोल रुतायचा, पाठीवर भलमोठ सामान, अंगावर सुती जाड कपडे, त्यात चालून चालून धाप लागायची(जरा थांबल की तो नालायक शेर्पा शिटी मारायचा आणी चालायची सूचना द्यायचा) अश्या समस्यांवर मात करत आम्ही तो मार्ग एकदाचा पार केला आणी एका डोंगराच्या कड्यावर पोहोचलो, जिथून एक सुसाट प्रवास चालू होणार होता. त्या डोंगरावरून आम्हाला हे भल्यामोठ्या बर्फाच्या उतारावर जवळपास १ किमी स्लाईड करत(घसरत जात) जायचं होत(सामानासकट). एकेक जण पुढे जायला लागला, माझ्यापुढे मंदार,प्रसाद, प्रदीप गेले, मग मी जसा उतारावर बसलो, पाय पसरले, आणी हात वर करताच जे घास्र्गुंदिसारखा घसरत खाली जायला लागलो ते पण सुसाट वेगाने(अगदी घसरगुंडी वरून उतरतात तस), मला एकदम ६०-७० ने बाईक चालवल्यासारख वाटत होत. मी तुफान वेगाने घसरत चाललेलो, शेवटी जिथे उतार संपला तिथे माझ्या वेगाला चाप लागला, आणी मे काही क्षण तेथेच बसून राहिलो, एकदम मला भलत्याच विश्वात गेल्यासारखे वाटते, मजा,थ्रील,वेग,साहस या सगळ्या गोष्टी एकदम अनुभवायला मिळाल्या होत्या त्यामुळे छाती नुसती जोरजोरात धडधडत होती. जरा दम खात होतो तर तेवढ्यात पाठून जुमाना उर्फ जुम्मी तुफान वेगाने घसरत आली आणी तिचा वेग कंट्रोल न झाल्याने माझ्या बॅगेवर जोरात आदळली, आणी मी तिच्या धक्क्याने उलटा पालटा पडलो बर्फात.(लाथ घातली तिने पेकाटात तर काय होणार माझ). मग थोडीशी मजल दरमजल करत बर्फातून चालत होतो, मध्येच हिमनद्या प्रचंड वेगाने वाहताना दिसत होत्या. परत एका पोईंट वर जेव्हा पोहोचलो तेव्हा अजून साधारण १ किमी ची दुसरी स्लाईड करायची होती. मला खूप आनंद झाला ते ऐकून. मग परत तंगड्या पसरून हात वर करून जे उतारावर आपली डेक्कन क्वीन धावत सुटली की विचारू नका. या वेळी उतार अजून स्टीप होता मागच्यावेळपेक्षा, त्यामुळे वेगही जास्त होता, या वेळी तर मला वेग नियंत्रित करता न येऊन डोक्यावरून आपटून उलटा पालटा होत गडगडत मी काही अंतर गेलो आणी आपोआप त्याच वेगात परत मूळ पोझिशन वर आलो(मला कळल नाही हे कस शक्य आहे पण झाल खर). उतर एकदाचा संपला, या वेळी पटकन उठलो(नाहीतर परत लाथ बसायची पेकाटात).

मग मजल दरमजल करत आम्ही एकदाचे ‘बिस्केरी थाच’ कॅम्प वर पोहोचलो. त्या दिवशी तिकडे नाश्त्याला गरमागरम मुगभजी होत्या, आमच्यातील प्रत्येक जण बांगलादेशातून आल्यासारखा भजीवर तुटून पडला, त्या गाईड ने पण आमच्या भुकेल्या निर्वासित बांधवाना भरपूर वेळा मुगभजी रिपीट दिल्या.(अर्ध्या आम्ही जोशी ग्रुप ने संपवल्या). मग सूप प्यायलो. त्या दिवशीची प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं, आयुष्यात काहीतरी जिगरबाज गोष्ट केल्याच सुख लाभत होत, मला तर विश्वास च बसत नव्हता की कासोल मधून अशक्यप्राय वाटणारा सारपास आम्ही सर केला, तो पण निर्विघ्नपणे. अगदी जेष्ठ नागरिक असलेल्या मा पा पासून ते १५ वर्षाच्या गुजराती मुलापर्यंत सर्वानी ती सफर यशस्वी केली होती. कुणीही माघारी परतला नव्हता. सर्वच्या सर्व धडधाकट होते. बिस्केरी वर आम्ही आमच्या ग्रुप च्या नावाने एकच जल्लोष केला. मग नंतर आम्ही मोकळ्या वेळात ‘दमशेराज’ खेळलो. त्यात मंदार ने सुंदर अभिनय करून चित्रपट ओळखायचे काम सोपे केले.(एकेक चित्रपटांची नाव अगाध होती हा भाग वेगळाच). मग जेवण केले, त्या रात्री मी आणी आमच्यातल कुणीच कॅम्प फायर मध्ये सहभागी न होता निद्रेच्या अधीन व्ह्याचे ठरवले आणी जय महाराष्ट्र म्हणत भरल्या मनाने सुखात झोपलो.

July 22, 2010

२२ मे- झिरमी

काल जरा सुखाने झोपल्याने सकाळी जरा उशिरा जाग आली, प्रसाद ने फटके मारून उठवलं. उठल्यावर पाहतो तर आमचे अप टू देट मंदार शास्त्री साहेब आवरून तयार होते. मग पटापट मे आवरून टेंट साफ केला. नाश्ता केला आणी डब्यात जेवण घेतलं. ७.३० ला कुलकर्णी सरांना आणी ‘फुआलपानी’ ला जय महाराष्ट्र केला. आजचा प्रवास ९५०० फुट फुआलपानी ते ११००० फुट झीरमी असा होता. आम्ही जसजसे उंच उंच चढत होतो तसा Altitude sickness ची काही लक्षण काही जणांमध्ये दिसायला लागली. कानडी मंडळीतील राजलक्ष्मी हिला पित्त होऊन उलटी चा त्रास झाला मग त्या दिवसापुरता बाईनी पोर्टर घेतला. ‘हैप्पी’ लं सुद्धा थोडफार मळमळत होतच. तसेच सर्वात जेष्ठ अश्या मा-१ आणी २ यांना पायदुखीचा त्रास व्हायला लागला. तेव्हा आमच्यातील वैद्य श्रीकांत जोशी याने सर्वाना वैद्यकीय उपचार करून दिले आणी सर्वांचे आशीर्वाद मिळवले.(नंतर डॉक्टर साहेबाना फार डिमांड आली).

वाटेत आज प्रथम आम्हाला पर्वत शिखरावरून घसरत आलेला बर्फ एका सपाट जागी साचलेला मिळाला. मग बर्फ दिसल्यावर सर्वाना चेव आला. २ गात कडून एकमेकांना बर्फाचे गोळे करून मारायचा खेळ चालू झाला. आमच्यातील श्रीकांतराव जरा जास्तच उत्साह दाखवत खेळत होते(तसा तो प्रचंड शांत थोडासा संथ आहे.) त्यात गम्मत अशी झाली कि खेळता खेळता श्रीकांतच्या डोक्यावरचा गॉगल पडला आणी साहेबाना निघायच्या वेळी आठवल कि आपला गॉगल हरवला. मग सगळ्यांची शोध मोहीम चालू झाली. मी जरा नेहमीप्रमाणे तिरक डोक चालवून भलत्या ठिकाणी शोध घ्यायला लागलो, तेव्हा मला बाकीच्यांनी ‘तिकडे पडण शक्यच नाही गॉगल’’ असा शेरा मारला, आणी एका दगडाच्या थोड आतमध्ये मला काहीतरी कळ्या रंगाची वस्तू दिसली. तो नेमका श्रीकांतचा गॉगल होता. तोपर्यत सर्वानी आशा सोडून पुढे वाटचाल चालू केली होती, तेवढ्यात मी गाजावाजा न करता शांतपणे श्रीकांतच्या हातात(माज दाखवत) गॉगल टेकवला(त्यानंतर सहसा त्याने माझी खेचली नाही).

त्या दिवशीची चढण ४५ अंशाची सरळ होती, आणी जेवण झाल्यावर चढायला फार कठीण जात होते(आणी बर्फात खेळल्याने सर्वांचा बोका गार झालेला). आज सकाळी ट्रेक चालू करताना वरुणराजाने हजेरी लावल्याने पावसाळी ट्रेकचा अनुभाव्पण मिळाला. आधी सांगितल्याप्रमाणे इथे हवा तासागणिक बदलते. त्यामुळे लगेच थोड्यावेळात उन येऊन आम्ही चक्क ३ इंद्रधनुष्य एकाच वेळी पाहू शकलो. नुकत्याच पावसामुळे प्रसन्न झालेली हिरवळ आणी पायाखालच्या गवतावर आणी झुडुपाच्या पानांवर मोत्यासारखे चमकणारे टपोरे पाण्याचे थेंब मला चढ पार करायला उर्जा देत होते. वर पाहिलं कि दिसणारी बर्फाच्छादित हिमशिखरे, अभ्राच्छादित आकाश, हिरवीगार घनदाट झाडी असे सौंदर्य म्हणजे एक अप्रतिम सुखाची अनुभूतीच होती.

एकदाचे ४ वाजता झीरमी ला पोहोचलोच. आता मला जरा जमिनीपासून बरच वरती आल्याचा फील आला होता. तिकडले कॅम्प लीडर हे सुद्धा आपले मराठी गृहस्थ नाशिकचे श्री मुलमुले म्हणून होते. त्यांनी आमचे स्वागत केले. संध्याकाळी नाश्त्याला चहाबरोबर गरम गरम बटाटे वडे होते. झीरमी सुद्धा अत्यंत सुरेख जागा होती. त्यात कॅम्प लीडरने सांगितले कि इकडे रात्री अस्वलं येतात त्यामुळे रात्री कॅम्प फायर ही टेंट मध्येच होईल. जेवण झाल्यावर आमच्या जोशी गटातील फक्त मीच कॅम्प फायर ला जातीने हजर होतो. प्रत्येकाने आपापली कलाकारी करून दाखवली, मी सोनुपाजीच्या(ये मुंडा सबसे ज्यादा छा गया ट्रेक मे) आग्रहावरून मी ‘मल्हारवारी’ म्हणले. स्वत मुलमुले साहेबांनी गाण्याची काही अदाकारी पेश केली. त्या दिवशी सुद्धा कॅम्प फायर ला उपस्थिती मोजकीच होती. रात्री दुध पिऊन शांत चित्ताने मी रात्री ९.३० वाजता झोपलो

सारपास- एक अविस्मरणीय अनुभव

21 मे- फुआलपानी

आमच आजच्या दिवसाच टार्गेट ते म्हणजे ९५०० फुट उंचावरील ‘फुआलपानी कॅम्प’. सकाळी सगळ वेळेत आटपून, टेंट वगेरे साफ करून आम्ही नाश्ता केला, त्या दिवशीच जेवण डब्यात भरल, आणि सकाळी ७.३० रांगेत उभे राहिलो. सेनापती सोमण काकांनी आमच्या ग्रुप च्या वतीने कॅम्प लीडर आणि त्यांच्या आचारी वर्गाचे आभार मानले आणि त्यांना अलविदा करून फुआलपानी कडे रवाना झालो. वास्तविक वळण हे फार नागमोडी होते, नेहमीप्रमाणे आमचे जोशी ग्रुप चे शिलेदार पुढे गेले आणि मी रमत गमत चालू लागलो. वास्तविक माझ जड सामान मला त्रास देत होतच, आदल्या रात्री मी ‘आयोडेक्स’ लावल होत आणि वैद्य श्रीकांत कडून ‘रिली स्प्रे’ खांद्याला मारून घेतला(हे रोजच चालू होत, पण कुणाची मदत घ्यायची नाही हा माज आडवा आल्याने कुणाला मदत मागितली नाही आणि तसच निभावल).

वास्तविक माझा उजवा खांदा निखळला असल्याने, चढावर खूप ताण यायचा, तेव्हा श्रीकांत आणि बाकी जोशी मंडळीनी मला पोर्टर घायची सूचना केली(आमच्या ग्रुप मधील कविताने घेतलेला असल्याने) आणि माझी खिल्ली उडवायला लागले, पण पुण्याचे रक्त अंगात असल्याने आणि चिकाटी असल्याने मी दुर्लक्ष केल(हे चिडवण रोज असायचं श्रीकांतच पण त्याला काही दाद दिली नाही मी). वास्तविक ते जंगल म्हणजे फक्त सूचीपर्णी वृक्षांची दाटी होती, अत्यंत गर्द आणि घनदाट. त्या वाटेत मी अर्जीन्दार उर्फ सोनू बरोबर मराठा आणी शिखांचा इतिहास, शिवाजी महाराज, शीख पद्धती वगेरे वर तात्विक चर्चा केली चालता चालता. मध्येच गुजराती मंडळीनी मला त्यांच्या खाण्याच्या ब्रेक मध्ये सामील व्हायचा आग्रह केला आणी मी काही नमकीन पदार्थ त्यांच्याबरोबर खाल्ले.

साधारण ४ च्या सुमारास आम्ही फुआलपानी स्पॉटला पोहोचलो. वास्तविक तो कॅम्प म्हणजे १ टेकडीच होती. टेकडीवर एक मोठा उतार आणी उतर संपल्यावर लगेच आमचा टेंट. टेंट ची रचना पण फार विचित्र होती. फुआलपानी चे वैशिट्य म्हणजे इथे सर्व गोष्टीना ट्रेकिंग करावे लागते. जेवण,पाण्याचा नळ, अगदी नैसर्गिक विधिना सुद्धा. प्रत्येक वेळेला चहा,सूप,जेवणासाठी सुद्धा मोठा चढ चढून जावे लागत असे. या कॅम्पचे मुख्य आपला ‘मराठी माणूस’ श्री कुलकर्णी म्हणून होते. वास्तविक ते मुंबईतील बांद्र्याचे पण कायमचे दिल्लीत स्थायिक झालेले. त्यांनी मराठी मंडळी पाहून आपणहून आमच्या टेंट मध्ये येऊन आमच्याशी गप्पा मारल्या.(तेव्हा आमचा राज ठाकरे वाद नेमका टेंट मध्ये चालू होता, मी राजसाहेबांचा एकांडा शिलेदार मंदार-गौरव-प्रसाद च्या आरोपाना सामोरा जात होतो). त्यांनी दिल्लीत ही खूप मराठी माणस राहत असल्याचे सांगितले अगदी निर्भयपणे त्यामुळे ऐकून बर वाटल.

त्या दिवशी कॅम्प फायर ही अंधारात करावी लागणार होती ती पण एका टेकडीवर(तिथे पण ट्रेकिंग). आमच्या जोशी मंडळीनी काही रस दाखवला नाही आणी जेवण झाल्यावर एकजात सगळे आडवे झाले, पण मी गाणी वगेरे म्हणण्यात पहिल्यापासून अग्रेसर असल्याने मी एकटाच गेलो. किर्र काळोख असल्याने आणी त्यादिवशी जरा दगदग झाल्याने फार कमी मंडळी कॅम्प फायरला आली. तिकडे मी हैप्पी च्या आग्रहावरून शंकर महादेवन चे ‘ब्रेथलेस’ गाण सदर केलं. वास्तविक ९५०० फुटावर इतक्या विरळ ऑक्सिजन असताना सतत ३-४ मिनिट गाणे हे मोठे आव्हान होते आणी ते मी यशस्वीपणे पेलले. त्याचे फार कौतुक झाले(म्हणून शेवटच्या दिवशी पण मला सर्वांसमोर गायचा आग्रह झाला). तिकडे आम्ही कुठली जुनी-पुराणी गाणी आठवून किर्र काळोखात म्हणत होतो आणी थंडीत त्याची मज्जा अजूनच येत होती. आणी आनंद याने रेहमान च्या ‘वंदे मातरम’ ने केला आणी प्रसन्न मनाने झोपलो.

July 20, 2010

सारपास- एक अविस्मरणीय अनुभव

गुनाल पानी

सकाळी ५ ला उठलो(शिटी ही रोजच वाजत असल्याने सारखा उल्लेख करायचं कारण नाही). त्यादिवशी आम्हाला कुठे व्यायाम वगेरे नव्हता तर होती बाकी काम. सगळ आवरून मी,प्रसाद,मंदार,गौरव ने टेंट साफ केला(मी आणि मंदारने चलाखीने गुजराती बांधवाना कामाला लावले, रोज आमच्यातलेच कुणीतरी हे काम करत असल्याने मंदारने त्यांना कामाला लावायचे ठरवले होते आणि ते केलेच). rucksack भरून तयार होतीच. आदल्या दिवशी वजन उचलल्यावर मला ओके वाटलेलं. पण ताट, वाटी,भांड हे नाश्ता करून त्यात टाकल्यावर अचानक ती फारच जड वाटायला लागली आणि आता सामान कमी करायची सोय नव्हती कारण माझ्या bags गोडाऊन मध्ये जमा होत्या आणि परत येईपर्यत काही मिळणार नव्हत्या. जन्मताच मला नीट नेटकेपणा नसल्याने मे सामान त्यात व्यवस्थित भरले नव्हते असे मंदारने त्याचे मत व्यक्त केले. मंदारचे त्याबाबतीत खूप कौतुक करावेसे वाटते की हा एखाद्या मुलीला लाज वाटेल इतका टापटीप, नीटनेटका राहतो. वस्तू व्यवस्थितपणे सांभाळणे आणि काळजी घेणे ह्यात आमच्या कुणापेक्षाही तो सरस होता. मग मंदार ने माझ सामान लावायला मला मदत केली(अडला हरी म्हणून विनवण्या केल्यावर पट्ट्या तयार झाला). त्याने सामान लावले खरे नीट पण तरीही मला हायस काही वाटल नाही उचलून. मी ठरवल(मनात शिवी हासडून. काय ते सांगत नाही. बाई माणस पण वाचतात हो). ***** काही झाल तरी या वजनासकट सारपास पूर्ण करायचाच. कुणाची मदत घायची नाही, काय वाट्टेल ते होऊदे(ह्याला काही जण माज म्हणतात). मग बाहेर आल्यावर आम्ही नाश्ता केला. त्या दिवशी आम्हाला ब्रेड बटर आणि जॅम ब्रेड असे आपल्याला हवे तितके slices मुभा होती. आणि तेच अन्न दुपारच्या जेवणाला पण डब्यात भरून न्यायचं होत. डबा-बाटली भरली. मग आम्ही बेस कॅम्प सोडायला सज्ज झालो. तेव्हा आम्ही ५० जण आता एकमेकांना चांगले परिचयाचे झालेलो. त्यामुळे एकमेकांबरोबर फोटो काढण्याचा समारंभ झाला. त्या दिवशी मी ५-६ वेगवेगळे cameras एकाच वेळी हातात घेऊन फोटो काढले(त्यानंतर मला फुकट्या छायाचित्रकार समजून दहा दिवसात कुणीही मला कुठल्याही वेळी फोटो काढायला सांगायचा. विशेषत महेश-विभा जोडप्याचे बहुतांश कपल फोटो मीच काढले). मला एका गोष्टीच फार कौतुक वाटल जेव्हा एखादा ग्रुप बेस कॅम्प सोडतो तेव्हा युथ होस्टेलवाले इतके कौतुक करतात की अस वाटत की एवरेस्ट वर चाललोय. टाळ्यांच्या गजरात बाकी बॅचेस ने आणि युथ च्या स्टाफने आम्हाला निरोप दिला. सोबत टोकन ऑफ लव म्हणून अल्युमिनियम फोईल मध्ये २-४ चिक्की, १५-२० लिमलेट च्या गोळ्या, एक ग्लुकोस बिस्कीटचा पुडा, हे सामान दिले गेले. आमच आजच्या दिवसच डेस्टिनेशन होत ते ‘गुनालपानी’ कॅम्प. जे साधारण १० किलोमीटर दूर होत कसोलपासून. एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आम्हाला बस ने जायचं होत.

अर्ध्यातासाने बस आली(हिमाचलच महामंडळ). मी, पंकज,अविनाश आणि २-३ जण सर्वांच्या rucksack टपावर ठेवायला गेलो. आम्ही ५० जण एकदम आत शिरल्याने एकदम ठाणे महापालिकेच्या वागळे डेपो च्या बसच्या गर्दीची आठवण झाली. ज्या रिकाम्या जागा होत्या तिकडे पहिले स्त्री वर्गाला बसायला दिले. आम्ही बस मध्ये अंताक्षरी चालू केली(तेव्हापासून माझे गाणे म्हणणे चालू झाले ते ट्रेकच्या शेवटपर्यंत चालू होते.) पण कंडक्टर मामानी मनाई केल्याने तिथेच आवरते घावे लागले. तासभराच्या प्रवासानंतर आम्ही उतरलो, rucksack उतरवल्या. बस मध्येच आमचे ‘गुनालपानी’ चे गाईड महाशय भेटले. आम्ही उतरलो जिथे तो खरा घाट होता तिकडून सारपास दिसत होता पण त्यावेळी तो अशक्यप्राय वाटत होतं सर करायला.(केला पण हो) मग मी आम्ही हळूहळू मार्गक्रमणा करत निघालो. मी तेव्हापासून ‘जोशी ग्रुप’ बरोबर चालायचो नाही कारण प्रदीप मंदार प्रसाद यांना कायम पोहोचायची घाई असायची, मी हळूहळू थांबत थाबत ,रमत गमत कधी सोमण काका, कधी नेहा-कविता बरोबर, कधी पंकज-सोनू-दीपा बरोबर, कधी महेश-विभा अशा विविध ग्रुप बरोबर गप्पा मारत मारत, मैत्री वाढवत यायचो(कशी ते जोशी ग्रुपला माहित आहे). आम्ही साधारण ९ वाजता चालणे चालू केले होते. मी खर तर एक गोष्ट वाचकांना सांगतो की हिमालयाच्या निसर्ग सौंदर्याविषयी शब्दात लिहूच शकत नाही, मी बापजन्मात इतका सुंदर प्रदेश आणि निसर्ग पहिला नव्हता जो तेव्हा पाहिला. त्यामुळे मी फारसं वर्णन करणार नाही यापुढील लिखाणात निसर्गाच(तुम्ही जाऊन या आणि मग मला ५ मिनिट तरी बोलून दाखवा मानल तुम्हाला). ११ वाजता आमचा ब्रेक होता. आम्ही डोंगरावरील एका वैशित्य्पूर्ण घरात थांबलो, तिकडे टिपिकल हिमाचल प्रदेशातील कुटुंब राहत होते. तिकडल्या लोकांची परिस्थिती एकदम बेताचीच खर तर. एवढं निसर्गाने भरभरून दिल पण तरीही लोकांकडे फारशी संपत्ती वगेरे सापडत नाही. त्यांचे स्वभाव वैशिट्य म्हणजे ते लोक अत्यंत मनमिळाऊ, साधे, मदत करण्यात तत्पर असतात(विशेषत मुली). पाहुणचार हा त्यांना फार चांगला जमतो. सुमारे अर्ध्यातासाने आम्ही निघालो, रस्ता फार वेडावाकडा होता, बहुतांश भाग हा चढ होता. माझ्या महाराष्ट्रातील डोंगर दर्यात फिरायच्या आणि ट्रेक च्या अनुभवावरून मी एवढ नक्की सांगेन की हिमाचालची माती ही खूप भुसभुशीत आहे, पाय सहसा घसरत नाही, पाउल नीट आणि पूर्ण रोवल तर पाय मातीत व्यवस्थित रुततो, त्यामानाने आपल्या मराठी मातीत पाउल जास्त घसरते आणि उतारावर फार त्रास होतो. साधारण १.३० वाजता आम्ही लंच घेतला जो डब्यात भरून आणलेला. आम्ही जवळपास अर्ध अंतर कापलेल, अर्ध बाकी होत. ४ पर्यंत पोहोचणे हे टार्गेट होत. हिमाचल मधील तिकडली काही स्थानिक लोक एक छोटेखानी canteen ठेवायचे, जिथे Maggi, Egg Omlet-boiled egg, chocolates,etc वगेरे मिळायचं. फक्त दर जरा जास्त होते कारण त्यांना बाजारातून इतक्या उंचावर सामान घेऊन आणणे खर्चिक असायचे. मी आणि श्रीकांत ने सहज आम्लेट टेस्ट केल. बर होत. जेवण झाल्यावर, आम्ही परत मार्गक्रमणा चालू केली. थोडासा वेग मंदावलेला जेवण झाल्यावर.

साधारण ४ वाजता वेळेवर आम्ही ‘गुनालपानी’ ह्या पहिल्या कॅम्प वर १० किमी अंतर पार करून एकदाचे पोहोचलो. सारपास च्या मार्गावरील पहिला कॅम्प. अतिशय सुंदर जागा, समुद्रसपाटीपासून सुमारे ८००० फुट उंच. गेल्या गेल्या आम्हाला चहा दिला गेला, आम्हाला ५० जणांसाठी साधारण ७-८ टेंट अरेंज केलेले. २ स्रीेल वर्गाला आणि उरलेले आम्हा टोणग्याना. ५ वाजता आम्हाला Tomato Soup दिले गेले. तिकडल्या गाईड ने आम्हाला सांगितले की कोपर्यात एक पाण्याचा पाईप होता ज्यातून सतत २४ तास पानी वाहत असायचं ते आम्हाला सर्व गोष्टीना वापरायच होत. तिथे बारमाही नद्या असल्याने पाण्याचा काही तुटवडा नव्हता. मला २४ तास पानी सतत वाहत ठेवणे पटले नाही खरे(डोंबिवलीची सवय हो, लहानपणापासून शिकवलं पानी जपून वापरायच, शुक्रवारी येत नाही). मी त्यांना मजेत म्हणल म्हणल हा पाईप डोंबिवली पर्यंत पाठवा हो. त्यावर एकच हशा पिकला. तिकडे ५ वाजताच अंधार झालेला होता. ६.३० ला आम्हाला रात्रीचे जेवण दिले गेले. ८ वाजता कॅम्प फायर होती. ‘कोंबडी’ गाण मी २ दिवसापूर्वी म्हणल होत आणि ते अमराठी लोकांमध्ये लोकप्रिय केल होत(अजय अतुलने काहीतरी मानधन दिल पाहिजे मला, काय?). त्यामुळे पहिली फार्मायीश कोंबडी ची झाली. सगळे माझ्या गाण्यावर मनमुराद नाचले. मग मी अजून काही फास्ट बत वरची गाणी म्हणत आम्ही सगळे नाचत होतो. तेव्हा गुजराती ग्रुप मधील हेमलता उर्फ Happy, Jummi, Tapasvi यांनी सर्वाना गो उभे राहून गरबा करायची आयडिया दिली. त्यांनी त्यांच्या सेल वर गरब्याची गाणी लावली आणि सर्व नाचलो. फार कुणाला गरबा खेळणे जमत नव्हते, मी मात्र उंच पायांचा वापर करत वेगवेगळ्या स्टेप करत होतो. ते पाहून तिने मला बोलावले आणि सगळ्या ग्रुप लं मी आणि तिने गरब्याच्या काही स्टेप करून दाखवल्या. तरीही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. जोशी ग्रुप मधील प्रदीप, गौरव हे टेंट मध्येच पथारी लाऊन पडले होते. त्यांनी यात सहभाग घेतला नाही(प्रदीप ने खानणे-झोपणे सोडून कशातच रस दाखवला नाहीच पुढे). शेवटी ९.३० ला कॅम्प फायर संपलं आणि रात्री Bournvita पिऊन आम्ही १० ला झोपलो.

July 15, 2010

सारपास एक अविस्मरणीय अनुभव

19 may

चालू झाला ‘शिट्टीमय’ आयुष्याचा दुसरा दिवस. सकाळी ५ लं उठून तासाभरात आटपून आम्ही ६ वाजता परत व्यायामासाठी हजर झालो. कालच्याप्रमाणेच त्याच मैदानावर जोग्गिंग करत गेलो, आमच्याबरोबर आदल्या दिवशी आलेली बॅचपण होती. मग व्यायाम आटपून नाश्ता आणि चहा साठी परत बेस कॅम्पला ७.३० ला परतलो. नाश्ता करता करता अनेक जणांनी येऊन आमची कालच्या गाण्याची स्तुती केली. कॅम्प लीडर तर म्हणाले तुमचा कार्यक्रम हा आतापर्यंत सगळ्यात हिट आहे त्या दिवशी आमच Acclamatisation होतं. म्हणजे पुढचा ट्रेक करण्यासाठी एक छोटासा ट्रायल बेसिस वर ट्रेक ज्यात आम्हाला तिकडल्या एका छोट्याश्या टेकडीवर चढवून ट्रेक ची रंगीत तालीम घेणार होते, जेणेकरून शरीर हवामान आणि त्या प्रदेशाला acclamatise झालं पाहिजे. आम्हाला दिलेल्या rucksack मध्ये blanket भरली जेणेकरून ती थोडी वजनदार होईल आणि पाण्याची बाटली घेतली आणि चालू पडलो. आमच्याबरोबर युथ होस्टेल चा ट्रेनर पण होता. जवळपास माझ्याच वयाचा, कडका पण काटक होता. २-३ किलोमीटर आम्हाला चढायचं होत. बेस कॅम्प सोडल्यावर चालू झालं ते घनदाट जंगल आणि बाजूला देवादाराची सुंदर झाडं. तेव्हा डोंगर चढता चढता तिकडे माझी अनेक जणांशी ओळख झाली. पंकज-सोनू चा ग्रुप, कानडी बाला आणि मंडळी वगेरे. मजल दरमजल करत आम्ही एकदाचे टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. चढताना पंकज-सोनू ही ९ नंबरच्या टेंटची मंडळी सारखी ‘रंगीन पांडा’, रंगीन पांडा’ आणि ‘गीलीबिली गीलीबिली चिपाक चीपाक’ म्हणून घोषणाबाजी करत होती(त्याबद्दल नंतर खुलासा केलाच आहे), आम्हाला बाकी सर्वाना काहीच काळात नव्हत याचा संदर्भ काय. टेकडीवर(प्रदीप आणि की मंडळी )आराम करत असताना, कुणीतरी सरावंची ओळख परेड करायची कल्पना मांडली. मग सगळे पन्नास जण एकत्र बसलो व आपली ओळख करून द्यायला लागलो. बहुतांश कानडी मंडळी होती आमच्यात, आणि बरेचसे IT field मधले होते. ४ जण तर मुंबई IIT चे विद्यार्थी होते. गुजरात ची ७-८ टाळकी होती, महाराष्ट्रातले आम्ही ६ जण,सोमण काका, पंकज-सोनू च्या ग्रुप मधील अजून २-३ जण, संतोष काका, कविता-नेहा आणि त्यांची २-३ मंडळी असे १५-२० जण होतो. (मराठी असून पण आम्ही वेगवेगळेच फिरलो कधी मॉबने फिरलो नाही जसे कानडी फिरले, मराठी माणूस एकत्र येत नाही याचा अजून एक पुरावा, काय राजसाहेब कस होणार? ). अविनाश हा ओरिसाचा एकांडा शिलेदार होता. गुजराती मंडळी मध्ये दहावी झालेला १५ वर्षाचा मुलगा ते कानडी मंडळींमध्ये जेष्ठ नागरिक जोडप(ज्यांना आम्ही मा १ आणि पा म्हणायचो) आणि अजून एक जेष्ठ नागरिक ज्यांना आम्ही मा २ म्हणायचो. सोमणकाका, संतोष, नरेन, पेट्रिक, राजलक्ष्मी, विभा-महेश, विनय—विद्या ही विवाहित मंडळी होती. बाकी सर्व तरुणांचाच भरणा होता. खर तर गौरव शी ओळख माझी दिल्लीतच झालेली पण त्याच आडनाव पण जोशीच होत. आमच्या ग्रुप मध्ये ६ पैकी मी,प्रसाद,श्रीकांत,गौरव असे चार जोशी होतो, म्हणून आमचे नामकरण ‘जोशी ग्रुप’ असे करण्यात आले. मग थोड्यावेळाने ट्रेनर च्या आदेशानुसार परत उतरायला लागलो तेव्हा असच गप्पा मारत मारत कधी पायथ्याशी आलो ते कळलच नाही. खाली उतरल्यावर १ ग्रुप फोटो घेतला(५० जणांचे किमान ३०-३५ कॅमेरे असल्याने १५ मीनीट त्यातच गेली, एका जागी बसायची सवय नाही ना एवढा वेळ ). मग परत बेस कॅम्पला आलो टेंट साफ केला. तोपर्यंत जेवायची वेळ झालीच होती. मग १२.३० ला जेवलो.

दुपारी ३ वाजता आमच orientation होतं. युथ होस्टेल च्या कासोल बेस कॅम्प चे मुख्य गोगटे सर आणि एक अजून एक सर(बंगाली होते, नाव आठवत नाही, होता कुणीतरी बॅनर्जी). त्यांनी आम्हाला पुढच्या वाटचाली विषयी माहिती दिली. आणि आपले ठाण्याचे सोमणकाका यांना आमच्या SP-17 बॅचचे लीडर केले गेले(खर तर त्यांना आम्ही आधीच लीडर केलेला, राहिलेली औपचारिकता). आणि ओरिसाचा अविनाश ला Enviourment Leader केले गेले. रंगीन पांडा’ या आमच्या ग्रुप च्या टोपण नावाचा किस्सा तेव्हा कळला. सोमण काका हे एशियन पेंट्स मध्ये काम करतात आणि त्याचा लोगो ‘पांडा’ प्राणी आहे. आणि त्याचं जॅकेट फार रंगीबेरंगी होत आणि ते लीडर असल्याने रंगीन पांडा’ हे ग्रुपचे नाव रूढ झाले. मग नंतरच्या वेळेत आम्ही चहा घेतला. रात्री जेवण मग कॅम्प फायर. त्या कॅम्प फायर ला बराच बोर झालं. आम्ही हुल्लडबाजी करत, प्रेक्षकातून कॉमेंट पास करत होतो आणि सतत रंगीन पांडा’ घोषणाबाजी करत होतो. कार्यक्रम झाल्याने नेहमीप्रमाणे bournvita पिऊन झोपलो.

२0 मे
सकाळी ५ ला शिटी वाजली, मी गाढ झोपलेलो. प्रसाद ने लाथा घालून उठवल. आवरून चहा घेतला. त्या दिवशी सारपास ला आमच्या आधीची बॅच निघाली होती त्यांना युथ होस्टेलच्या पद्धतीने अलविदा केल आणि आम्ही Rock Climbing साठी सज्ज झालो. नाश्ता झाल्यावर आम्ही एका डोंगराच्या कड्याशी आलो. सुदैवाने कडा फार उंच नव्हता. जवळपास प्रत्येकाने यशस्वीपणे Rapelling पार पाडलं. मग आम्ही तिकडल्या पार्वती नदीच्या पात्रात उतरलो. प्रचंड वेगाने पाणी वाहत होते आणि खूप थंड सुद्धा होते. मी मनसोक्त पाण्यात डुंबलो(प्रदीप निसर्गाचे फोटो काढण्यात दंग होता). तिथे आम्ही एक खेळ सुरु केला(नाव आता आठवत नाही). आम्ही ६ जण पाळीपाळीने एकमेकांचे चांगले गुण आणि वाईट गुण(त्यांना वाटणारे) याविषयी चर्चा आणि अवलोकन करायचं आणि त्याला सुधारण्याबाबत सल्ले द्यायचे(माझा नंबर शेवटी होता त्याच कारण माझ्याविषयी प्रत्येकाची यादीच तयार होती. बघा किती उत्तुंग व्यक्तिमत्व आहे माझ). Rapelling करून १२ ला परत आलो. जेवलो जरा आराम केला.

२.३० वाजता आमच Rock Climbing होतं. हा प्रकार Rapelling पेक्षा खूप कठीण आणि वेळखाऊ होता कारण कडा चढायचा होता जमिनीपासून आणि काही फुट वर पोहोचायचं होत. ट्रेनरने प्रात्यक्षिक करून दाखवल्यावर बहुतांश लोक घाबरले. त्यात जेवणाने सुस्ती आल्याने आणि ते optional असल्याने बऱ्याच जणांनी प्रेक्षकाची भूमिका घेतली. जवळपास १० जणांनीच Rock climbing केल. त्यात आमच्यातील मी आणि श्रीकांत होतो. सर्वात शेवटी मी गेलो. सोमणकाका आणि गुजराती हेमलता उर्फ ‘हैप्पी’ याचं विशेष कौतुक कारण स्त्री वर्गात फक्त तिनेच कडा चढला आणि सोमण काका आम्ही Rock climbing केलेल्यांपैकी सगळ्यात मोठे होते. मला पण फार कष्ट करावे लागले. एकदा पाय घसरून माझ नाक जोरात दगडाला आपटून फुटणारच होत, तेव्हा सगळे घाबरले होते काही क्षण. जीवाच रान करून मी कसाबसा कडा चढला. २-३ दा आपटल्याने दगडाला मला थोड्याश्या जखमा झालेल्या खऱ्या. पण त्याच विशेष वाटल नाही.

४.३० च्या सुमारास चहा घेतला. संध्याकाळी आमची पुढच्या प्रवासाची पूर्वतयारी करायची होती, आमच्या बॅगा युथ होस्टेलच्या बेस कॅम्प वर Deposit करायच्या होत्या. आणि त्यातल सामान आपल्याला झेपणार इतक्या वजनाचा अंदाज घेऊन पुढच्या आठवड्याभराच सामान त्या Rucksack मध्ये भरायचं होत आणि त्याच्या वजनाची चाचणी तिकडले instructor घेणार होते. आणि ज्याच वजन जास्त असेल त्यांना सामान कमी करायला सांगणार होते. आम्ही सर्वानी सामान भरल. मी मुख्यत थंडीचे पुण्याहून आणलेले कपडे घेतले(म्हणल थंडीशी मस्ती नको पण निर्यय थोडा चुकलाच). माझ्याकडे माझ जेकेट जे मी नेहमी घालून फिरायचो (मला थंडी वाजत नव्हती खर तर पण अंगावर काही नसल कि युथ होस्टेल वाले ओरडायचे म्हणून) ते अजून १ स्वेटर, अजून १ जेकेट, मफलर, कानटोपी(जे मंदारनेच वापरल पुढे) रेनकोट, आणि अंगावरचे कपडे, औषध, इत्यादी घेतल. चपला घेतल्या नाहीत ही चूक केली आणि बरेचदा अनवाणीच फिरलो थंडीत.(काही झाल नाही देवाची कृपा.). चेकिंग चालू असताना एक किस्सा झाला. आमच्या टेंट मधील आमच्या सर्व गुजराती बांधवांच्या बॅगा फार जड लागल्या, लगेच सरांनी त्यांना सामान काढायला सांगितले त्यांनी बॅगेतून खाखरा, फरसाण, शेव, ठेपला अशी नानाविध गुजराती नमकीन पदार्थाचे पुडे काढले. सर ते पाहून अवाक झाले. त्यांनी विचारल हा काय प्रकार आहे, तर एकाने उत्तर दिले “वो क्या है ना सर, अभी अगले हफ्ता भर ट्रेक है तो कुछ खानेको तो लगता है ना बीच मे”. सरांनी डोक्याला हात मारला आणि सांगितले बाबा रे तू त्याची काळजी नको करू खायची सोय चांगली आहे तू खाण्यापेक्षा कपडे घे ते तुला फायद्याच आहे. (नंतर बाकी बॅचच्या orientation मध्ये गुजराती बांधवाना ही आगाऊ सूचना युथ होस्टेल द्यायला लागले.) आमच्या बॅगा आम्ही बेस कॅम्प लं जमा केल्या. घेतलेली blankets परत दिली. जेवलो. कॅम्प फायर आणि झोपलो. कॅम्प फायर ला आम्ही आणि SP-18 यांच्यात घोषणायुद्ध चालू झालं. आम्ही सरशी मारली ती गोष्ट वेगळीच. आमचा बेस कॅम्प वरची शेवटची रात्र होती ती

July 14, 2010

सारपास- एक अविस्मरणीय अनुभव

१7 मे
सकाळी ८.३० ला जाग आली तेव्हा पहिले दिसला तो घाटाचा रस्ता. अजस्त्र हिमालय, पार्वती नदीचे विशाल प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याचे पात्र, आणि आजूबाजूचा सुंदर निसर्ग. तो घाट अत्यंत वेड्यावाकड्या वळणांचा आणि अरुंद होता. रात्रभर अरुंद सा वरून बसून पूर्ण अंग धरले होते. पायाची तर पुरती वाट लागलेली(वाटल भून्तरला उतरल्यावर हाडांचा हिशोब जमवावा.) अखेरीस मंडी शहर ओलांडून आम्ही ९ च्या सुमारास भून्तर गाठले. रात्री जेवलो नसल्याने कडकडीत भूक लागलेली. तिकडे एका छोटेखानी धाब्यावर गरम गरम परोठे आणि जिलेबीचा नाश्ता केला. दिल्लीतील प्रचंड उष्म्याचा, २ दिवसाच्या प्रवासाचा त्रास इकडल्या हवेतील गारव्याने खूप कमी झाला. गार हवेत गरम चहा प्याय्लावर फारच फ्रेश वाटल. मग मंदार प्रदीप गौरव काही खरेदी करायला भून्तर च्या बाजारात गेले. मग मी आणि प्रसाद भून्तर फिरायला गेलो. अतिशय छोटे, सुंदर, पंधरा हजार वस्तीचे गाव. जवळपास सर्व गोरे लोक, घरे पण छोट्या आकाराची आणि नियोजनबद्ध. आता इंटरनेट सारखी सोय पण या दुर्गम गावात आहे. हिमाचल प्रदेश च्या हवामानाचे वैशिट्य म्हणजे इकडे हवा मिनिटा मिनिटाला बदलते. घटकेत मळभ दाटून येत, तर मध्येच उन. कधी जोरदार पाऊस. सगळच अनिश्चित. मी तिकडे एक जर्सी विकत घेतली एक आठवण म्हणून. खर तर युथ होस्टेल चा बेस कॅम्प हा ‘कसोल’ गावात होता, जे भून्तर पासून तासभर आहे. मग सगळ्याचं आवरून झाल्यावर आम्ही ‘कसोल’ ची बस पकडली आणि साधारण ११-११.३० ला युथ होस्टेल च्या बेस कॅम्प वर पोहोचलो.

जवळपास अडीच दिवस प्रवास करून आम्ही कसोल गाठले. तिकडे आम्हाला पहिले reporting करायचं होतं. सगळ्या कागदी औपचारिकता पूर्ण केल्या. आमच्या बॅचचे नाव होते SP-17. याचा अर्थ सारपास लं जाणारी युथ होस्टेल ची १७ वी बॅच. आम्हाला ६ नंबरचा टेंट मिळाला. तिकडे आधीच्या बॅचचे काही लोक होते जे आदल्या दिवशी आलेले. मग आम्हाला Blankets, Sleeping bags, Rucksack दिल्या गेल्या. साधारण १२.३० च्या सुमारास जेवण मिळाले. इथे एक विशेष सांगावेसे वाटते कि अख्ख्या ट्रेक मध्ये कधीही जेवण उशिरा किवा कमी मिळाले असे झाले नाही. खाण्यापिण्याचे नियोजन अत्यंत सुंदर पद्धतीने केल्याबद्दल युथ होस्टेल च्या स्टाफला सलाम!!.

त्या दिवशी आम्हाला काही कार्यक्रम नव्हता. मग दुपारी आम्ही विश्रांती घेतली. संध्याकाळी मे सोडून सगळे जवळच्याच प्रसिद्ध ‘मणीकर्ण’ येथील गरम पाण्याच्या कुंडात अंघोळीला गेले(मी प्रवासाला कंटाळलेलो असल्याने मी अंघोळीला गोळी दिली). थोडावेळ टेंट मध्ये वाचन करत बसलो. मग कंटाळा आल्याने एकटाच फेरफटका मारायला निघालो कॅम्पचा. श्रीकांत ने त्याचा मोबाईल माझ्याकडे दिलेला असल्याने मी कॅम्प च्या आवाराचे फोटो काढत होतो. कॅम्प ची जागा ही प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पार्वती नदीच्या काठाशी होती. निसर्गाने सौंदर्याचे दान भरभरून टाकलेली जागा होती ती. नदीच्या खळखळत्या पाण्याचा प्रचंड आवाज सतत येत होता(रात्री हा आवाज भयानक वाटतो). मग तिकडे आनंद सोमण नावाचे ठाण्याचे गृहस्थ मला भेटले(कुणीतरी मराठी माणूस भेटल्याचा आनंद झाला). मग बोरिवलीचे पंकज-अर्जीन्दर सिंग यांचा ग्रुप, आमच्या टेंट मधील भावनगरच्या गुजराती बांधवांचा ग्रुप, मुंबईच्या कविता-नेहा यांचा ग्रुप, बेंगलोर च्या अदिती इन्फोटेक कंपनीच्या विभा-महेश, आनंद-ह्युबी यांचा ग्रुप, यांच्याशी ओळख झाली(बाकीच्यांची ओळख दुसऱ्या दिवशी झालीच). आमची ५० जणांची बॅच होती. तेवढ्यात हे पाच जण अंघोळ करून परत आले. मग दुपारी चहा झाला. रात्री ८.३० ला जेवण आणि नंतर ‘कॅम्प फायर’ होती. ती एन्जोय करून आम्ही १० वाजता Bournvita(युथ होस्टेलच देते) पिऊन झोपलो.


18 मे
सकाळी ५ वाजता शिट्टी वाजली आणि तेव्हापासून चालू झाले ते ‘शिटीमय’ आयुष्य. कारण सगळ्या गोष्टी शिट्या च्या तालावर होणार होत्या पुढचे सर्व दिवस. आम्ही उठलो, अर्ध्या तासात आवरल सगळ, आणि सकाळचा चहा घेऊन ६ वाजता रिपोर्ट करायचं होत. (नेहमीप्रमाणे)मी आणि श्रीकांत ने १० मिनिटे उशिर केला. पण पहिला दिवस असल्याने जास्त कुणी बोलले नाही. आम्हाला कॅम्प वरून जोग्गिंग करत करत अर्ध्या-एक किलोमीटर वरील मोकळ्या मैदानात नेले गेले. मी सुरुवातीला माझ्या ग्रुप बरोबर होतो मग पळत पळत सगळ्यात पुढे असलेल्या मिलिटरी मधील पंकज बरोबर सामील झालो. तसा माझा stamina चांगला असल्याने आम्ही दोघ बरोबर जोग्गिंग करत होतो. आणि सर्वात पहिले मैदानात पोहोचलो. मग युथ होस्टेल च्या ट्रेनरने बर्फात ट्रेकिंग करण्यासाठी फिट राहावे म्हणून जोरदार वॉर्म अप एक्सरसाईज करून घेतला. बरेच दिवसाने एवढा व्यायाम केल्याने जरा पाय दुखायला लागले(पण नंतर त्याचा खूप उपयोग झाला). साधारण ७.३० पर्यंत आम्ही परत बेस कॅम्पवर परत आलो. मग नाश्ता झाला, टेंट साफ केला. त्या दिवशी आमच्या बॅचला रात्रीच्या कॅम्प फायर मध्ये कार्यक्रम सादर करायचा होता(हा नियमच आहे, प्रत्येक बॅचला कराव लागत). मग मला तिकडे काहीतरी मराठी गाण सादर करायचा प्लान डोक्यात आला. मग ‘जय जय महाराष्ट् माझा’ हे गाण मी सुचवले. पण प्रसाद-मंदार कडून मला विरोध झाला(त्यांना वाटले बरोबर वाटणार नाही ते गाण, कारण आम्ही हिमाचलमध्ये होतो आणि बाकीचे लोक दुखावले जातील अस त्यांना वाटले). मी सुरुवातीला उडवून लावलं त्यांना, मग मी विचार केला जाऊदे नको उगाच राडा!! म्हणून सेटलमेंट म्हणून ‘कोंबडी पळाली’ गायचं ठरल. पण त्यासाठी गरज होती ती गायिकेची जीला हे गाण येत किवा मराठी येणाऱ्या मुलीची. मग मी कविता आणि नेहाला कल्पना सांगितली त्यांनी होकार दिला. माझी गाणी पाठ असल्याने मी त्यांना शब्द लिहून दिले, आम्ही तालमी केल्या. मग ते गाण बसल.तेवढ्यात बाकी पाच जण भून्तर वरून दिल्लीच्या परतीच्या प्रवासाच्या तिकिटासाठी एजंट कडे गेले, मी परत तालमींच्या नावाखाली त्यांना तंग दिली.बाकी माझे मित्र या गाण्याला कोरस देणार होते. पण महाराष्ट् गीत गायचं माझ्या मनात कुठेतरी होत. मी जशी संधी मिळेल तस गायचच अस ठरवल.

नेहमीप्रमाणे ८.३० ला जेवण झाले. मग चालू झाली ती कॅम्प फायर. सुरुवातीलाच कर्नाटक च्या १० जणांनी त्याचं राज्याच गीत ‘जय कर्नाटक माते’ चालू केल आणि आपली मराठी खोपडी सणकली. मी तिथे मित्रांना फर्मान सोडल मी महाराष्ट्र गीत गाणारच तुम्हाला साथ द्यायची तर द्या नाहीतर नका देऊ. माझ सादरीकरण शेवटी होत त्यामुळे मधल्या वेळात इतरांचे कार्यक्रम चालू असताना मी महाराष्ट्र गीतासाठी फिल्डिंग लावायला चालू केली. जो मराठी दिसेल त्यांना सामील व्हायला सांगितले. अगदी आमचे लीडर सोमणकाका पण तयार झाले. पण त्या आधी होता ‘कोंबडी’ चा पर्फोर्मंस. मी, कविता-नेहा अस तिघ मिळून ते गाण दणक्यात गायलो. मग थोडा वेळ उरलेला होतं मग मी आयोजकांना विनंती केली अजून एक गाण्यासाठी. लगेच ५ मिनिटांनी अवधूत गुप्तेचे ‘महाराष्ट्र गीत’ मी चालू केले, हळूहळू बरेच जण आमच्या पाठी कोरसला येऊन उभे राहिले आणि ते गाण तुफान म्हणल गेल.(कानडी, पंजाबी, गुजराती इत्यादी सर्वाना महाराष्ट्र गीत समजल काय आहे ते. जेव्हा परत चुकून कुणी ऐकलच त्यापैकी तर माझी आठवण नक्कीच काढतील). मग मी जी महाराष्ट्र आणि शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन तो परिसर दणाणून सोडला. मगच सुखाने झोपलो रात्री. एक वेगळेच समाधान मिळाले. जय महाराष्ट्र.

July 13, 2010

सारपास- एक अविस्मरणीय अनुभव

पूर्वार्ध:

साधारण जानेवारी महिन्याचा काळ होता. माझा कॉलेज मधील मित्र प्रसाद जोशी याने हिमालयीन ट्रेकिंग चा त्याचा मानस आमच्या कॉलेजच्या कॅनटीन मध्ये बोलून दाखवला. सुरुवातीला मी त्याला काही प्रतिसाद दिला नाही. संध्याकाळी सहज बाबांच्या कानावर हा मानस घातला तर अनपेक्षितपणे मला लगेच संमती मिळाली. मग प्रसादने प्रवासाच्या तिकिटांचे आरक्षण करायची जवाबदारी घेतली, आणि जाताना-येताना दोन्ही वेळचे गरीबरथ एक्सप्रेसचे आरक्षण केले(त्याचा फायदा झाला खूप नंतर. सुखकर प्रवासाचे श्रेय मी प्रसादला देईन ) मग मी आणि बाबा साधारण फेब्रुवारी मध्ये परळ च्या युथ होस्टेलच्या ऑफिसात नाव नोंदवून आलो. त्यांनी १७ मे ची बॅच मला आणि प्रसाद ला दिली. प्रसाद बरोबर त्याचा भाऊ श्रीकांत हासुद्धा येणार होता.
मी ट्रेकची तयारी TYBcom च्या परीक्षेनंतरच करायचे ठरवले होते. २७ एप्रिलला माझी परीक्षा संपली आणि मी तयारी चालू केली. पहिल्यांदाच एवढे दिवस घराबाहेर जाणार असल्याने खूप सामान दिलेलं आई वडिलांनी. हिमालयातील थंडी लक्षात घेऊन थंडीचे कपडे आणायचं चाललेलं पण अचानक पुण्याच्या काकाकडून ते आणायचं ठरल आणि ते आई घेऊन आली. बाकी इतर बारीक सारीक वस्तू मी प्रसाद श्रीकांतनि सल्लामसलत करून घ्यायचे ठरवले. त्यात असे कळले कि आमच्याबरोबर श्रीकांतचा मित्र प्रदीप, प्रदीपचा मित्र मंदार आणि मंदारचा मित्र गौरवपण येणार आहेत. साधारण १५ तारखेला मे सगळ्या बॅग भरून ठेवल्या आणि जाण्यास सज्ज झालो.

15 मे २०१०
अखेर तो दिवस उजाडला. सकाळी सर्व आप्तांना कळवून मी जेऊन आईबरोबर दुपारी १ च्या सुमारास निघालो. गरीबरथ वांद्रे टर्मिनस स्थानकातून निघते. वांद्रेपर्यंत चे तिकीट काढून २ च्या लोकलने दादर गाठले. दादरला प्रसाद, श्रीकांत आणि प्रदीप भेटले. मग आम्ही ब्रीज चढून पश्चिम रेल्वेच्या लोकलने वांद्रे गाठले. वांद्रे स्थानकात मंदार बोरिवलीहून आला. गौरवने दिल्लीकडे पश्चिम एक्सप्रेसने आधीच प्रयाण केले होते,त्यामुळे तो दिल्लीत भेटणार होता. वांद्रे स्थानक ते वांद्रे टर्मिनस हे १५ मिनिटाचे अंतर भर उन्हात आम्ही कापले. तो भाग झोपडपट्टीचा आणि अत्यंत घाणेरडा आहे. आईने कोरडा खाऊ न त्या दिवशीच रात्रीच जेवण अस भरगच्च अन्न बरोबर दिल्याने मला सामानाचा तिसरा जोड करावा लागला. आम्ही ३.३० च्या सुमारास एकदाचे वांद्रे टर्मिनस गाठले. गाडी ५.३० ची असल्याने निवांत होतो. मग एकमेकांच्या ओळखी झाल्या कारण प्रसाद आणि श्रीकांत सोडून, प्रदीप आणि मंदार मला नवीनच होते. काही वेळाने माझे आणि प्रसादचे बाबा ऑफिस मधून परस्पर वांद्रे टर्मिनसला आले. मग मी आणि प्रसाद गाडीच्या डब्यांची स्थिती पाहायला गेलो. वांद्रे टर्मिनस चे दुसरे टोक जवळपास खारच्या वेशीपर्यंत जाते. तिकडे स्टेशन मास्तरकडे चौकशी केली, तिकडे काही स्थिती कळली नाही, मग आम्ही तसेच परत आलो. साधारण ५ वाजता इलेक्ट्रोनिक इंडिकेटर वर नेमका आम्ही बसलो तिकडे आमचा G-१ डब्बा येणार होता. गाडी वेळेवर आली मग आम्ही चढलो, बॅग ठेवल्या. या चौघांचे बर्थ २१-२४ असे ओळीत होते मला ७५ क्रमांकाचा बर्थ होता. पण ते आम्ही परस्पर adjust करून घेतले. ५.३० ला गाडी वांद्र्याहून रवाना झाली आणि आम्ही सर्वांचा निरोप घेतला.

आमच्या समोरच्या बर्थ वर एक गुजराती कुटुंब आल्यापासून डबा डोक्यावर घेत होते, त्यांचे वैशिट्य म्हणजे त्यांनी गाई सुटल्यापासून ते चरायला सुरुवात केली ते दिल्ली पर्यंत त्याचं चरण चालूच होत. मी मंदार,प्रसाद गप्पा मारत होतो. श्रीकांत पुस्तक वाचत बसलेला. प्रदीप बर्थवर आडवा झाला(त्याला झोपायची किती आवड आहे ते नंतर समजलच). साधारण ८.३० सुरत आलं. मग आम्ही जेवायला बसलो. मंदारचा शनिवारचा उपवास होता त्यामुळे त्याने उपवासाचा चिवडा आणलेला(नंतर चुकून बाकरवडी तोंडात टाकली आणि गिळल्यावर कळल पठठयाला उपवास आहे ते). मे मटकीची उसळ, प्रसादने परोठे, श्रीकांतने चित्रान्न(कानडी भात) आणलेला. संपवताना नाकी नऊ आले सगळ्यांच्या(शेवटी मीच संपवल सगळ). मग तासाभराने बडोदा स्थानकात मी आणि प्रदीप उतरलो तिकडे शीतपेय घेतली. १० च्या सुमारास झोपायचे ठरले, बॅगाना व्यवस्थित कुलूप लावली. मग श्रीकांत-प्रदीप सर्वात वरच्या बर्थवर, मंदार-प्रसाद मध्ये आणि मी सर्वात खालच्या बर्थवर झोपलो(झोप लागली नाही सामान चोरीला जाण्याच्या भीतीने,जग राहव म्हणून पुस्तक वाचत बसलो होतो उशिरापर्यत). मध्येच रात्री समोरच गुजराती कार्ट उठल आणि खायला मागायला लागला आईकडे त्याच्या. आश्चर्य म्हणजे आईने त्याला खाकरा दिल्या(मनात विचार आला, आमच्या आईने उत्तरपूजाच केली असती आपली) वाचता वाचता झोप कधी लागली कळलच नाही.


१6 मे
सकाळी ८.३० च्या सुमारास उठलो. तर माझ्याआधी सर्व उठलेले. उठल्यावर कळले गाडी जवळपास २ तास उशिराने धावत आहे. त्यामुळे १०.३० च्या ऐवजी आम्ही १२.३० पर्यंत दिल्ली गाठू असे वाटले. मग आवरून सकाळी नाश्त्याला परोठे खाल्ले, मग प्रसाद मी आणि मंदार रमी खेळत बसलो(मी शिकवली त्यांना). श्रीकांत वाचनात गुंग तर प्रदीप आराम करत होता. रखडत रखडत गाडी साधारण १ च्या सुमारास हजरत निजामुद्दिन स्टेशनला पोहोचली. मग गौरवपण तिकडे आधीच पोहोचलेला असल्याने तो तिकडेच भेटला. मला खर तर दिल्लीच्या पुढील प्रवासाची काहीच idea नव्हती. ते सगळ मे प्रसादवर सोपवलेल. आम्हाला मग काश्मिरी गेट भागातील ISBT ला जायचे होते. मग आम्ही निजामुद्दीन ते नवी दिल्ली स्टेशन एका दुसऱ्या गाडीने गेलो. मी नवी दिल्ली स्टेशन पहिल्यांदाच पाहत होतो. अत्यंत गजबजलेल,विस्तीर्ण, सगळे टिपिकल उत्तर भारतीय बांधव दाटीवाटीने जागा मिळेल तिकडे ठाण मांडून बसले होते(महाराष्ट्रात पण तेच करतात). नवी दिल्लीचा भला मोठा पुल ओलांडून स्टेशनबाहेर आलो.

आल्याआल्या सामना करावा लागला ते दिल्लीच्या प्रचंड उन्हाळ्याचा, त्यादिवशी तापमान ४५ होत. उन्हाच्या प्रचंड झळ्या लागत होत्या. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला लागूनच नवी दिल्ली मेट्रोरेल्वे स्टेशन आहे. तिकडे तिकीट काढायला गेलो तर ही प्रचंड लाईन(ठाणे स्थानकापेक्षा पण जास्त म्हणजे बघा). प्रदीप,प्रसाद,मंदार तिकीट काढायला गेले. मी,श्रीकांत,गौरव (भल्यामोठ्या सामानाची) रखवालदारी करत होतो(दिल्लीत चोऱ्यामाऱ्या फार होतात अस ऐकून होतो म्हणून). अर्ध्यातासाने तिकीट घेऊन तिघं परत आले. मग आम्ही ट्रेन पकडायला प्लॅटफॉम वर निघालो तर बघितल विमानतळावर होते तशी आमची आणि आमच्या सामानाची तपासणी केली गेली. दिल्ली तशी मला फार आवडली नसली तर मेट्रोच मात्र मी खूप कौतुक करेन, गर्दीचे, सुरक्षेचे, ट्रेनच्या frequency अत्यंत सुंदर,काटेकोर नियोजन केले आहे शीला दीक्षित बाईनी. नवी दिल्ली नंतर चांदणी चौक मग लगेच काश्मिरी गेट आलं. ते मेट्रो स्टेशन म्हणजे मॉलच होता तो. नंतर आम्ही हिमाचल प्रदेश मधील ‘भून्तर’ च्या संध्याकाळच्या बसच तिकीट काढायचं ठरवल. प्रवास तसा कंटाळवाणा झाल्याने आम्हाला लक्झरी बस हवी होती, पण गर्दीचा मौसम असल्याने आम्हा सहा जणांना एका बसच तिकीट मिळाल नाही. तिथे जरा प्रदीपचे न माझे-प्रसाद चे मतभेद झाले. प्रदीप वेगवेगळ्या बसने जायला तयार होता. पण मी आणि प्रसाद ने काही झालं तरी एकत्र जायचं ह्या बाण्यावर ठाम राहिलो शेवटी तेच सर्वानी मान्य केल. मग आम्ही भून्तर साठी हिमाचल परिवहन च्या जनरल बस च(आपलं महामंडळ) तिकीट काढलं.

तेव्हा साधारण दुपारचे ४ वाजले होते. जेवण झाले नसल्याने पोटात आग पडली होती सर्वांच्या, आणि त्यात उन्हाचा तडाखा जाणवत होता. त्यामुळे चांगल्या हॉटेल साठी पायपीट न करता आम्ही तिकडेच एका साध्या हॉटेलात जेवलो(ते त्याने कधी बनवल होत देव जाणे). पावती मागितली तर वरचा कर भरावा लागतो हे पहिल्यांदाच पाहत होतो. बस ७.३० ची होती. जेवण होईपर्यंत आम्हाला ५ वाजले. वेळ कसा काढायचा हा मुख्य प्रश्न होता. उन्हाने आणि प्रवासाने हैराण असल्याने कुठे फिरायची आमची ताकद नव्हती दिल्लीत. मग काश्मिरी गेट च्या मॉलमध्ये McDonald मध्ये आम्ही गेलो. तिकडे आईस्क्रीम मी रवंथ करत २ तास खात बसलो होतो, काय करणार वेळ काढायचा होता(तिकडे अजून ठाण मांडायचं कारण मंदार-श्रीकांतला माहितीच आहे). ७.१५ ला आम्ही ISBT च्या बस स्थानकात गेलो. तिकडे बघतो तर प्रचंड मोठा आवार. अतिशय गलीच्छ, घाणेरडा, प्रचंड गोंगाट आणि प्रचंड गर्दीने गजबजलेला होता. ७ क्रमांकाच्या फलाटाला आमची भून्तर ची बस वेळेत आली. आमच्या प्रचंड सामानाला बसमध्ये ठेवायला जागा नव्हती मग कंडक्टर लं विचारून मी प्रदीप, श्रीकांत बसच्या टपावर सामान ठेवायला गेलो. सामानाला कुलुपं लावून ते दांड्याला व्यवस्थित बांधल. साधारण ८ च्या सुमारास बस रवाना झाली भून्तरला. दिल्लीच अजून एक वैशिट्य म्हणजे रुंद, चौपदरी आणि सुंदर रस्ते. बस लागायच्या भीतीने डॉक्टर श्रीकांत कडून बस न लागायच्या गोळ्या घेतल्या. दिवसभराच्या पळापळीने दमलो असल्याने मी लगेच झोपलो. अपेक्षेप्रमाणे बसच्या सीट जुनाट आणि २ सीटमधील अंतर फारच लहान होते त्यामुळे पाय अडकले होते(हा त्रास नंतर प्रत्येक बस मध्ये झाला). बाकी सगळे बस मध्ये जिथे ब्रेक घ्यायची तीकडे उतरायचे पण मी मात्र काही उतरलो नाही(थोडक्यात विकेट पडलेली)