दिवाळी म्हणजे सणांची राणी. आनंदाचे उधाण. नवीन कपडे, फराळाचे पदार्थ, फटाके, गोडधोड पदार्थ इत्यादी. हे झाल पारंपारिक टिपिकल समीकरण. या वर्षी एक मी प्रकर्षाने पाहिलं की दसरा होऊन १० दिवस झाले तरी दिवाळीच्या चाहुलीचा काही पत्ताच नाही. दिवाळी अवध्या १५ एक दिवसांवर आहे असे वाटतच नव्हतं. अचानक माझं मन flashback मध्ये गेलं. मी साधारण १०-१२ वर्षांपूर्वीच्या काळात गेलो. तेव्हाचं दिवाळीचं स्वरूप आणि आताचं यात काळानुरूप बराच फरक पडलाय. साधारण दसरा-दिवाळी एकाच महिन्यात येत असल्याने त्या महिन्याच्या सुरुवातीलाच घरातील बायका (विशेष सूचना-मी मध्यमवर्गीय दिवाळी बद्दल बोलतोय जिंदल, अंबानी, टाटा यांच्या नाही )पुरुषांना सांगून ठेवायच्या, "या महिन्याला किराणा जास्त लागेल, फराळाचे पदार्थ तयार करायचे आहेत". मग बायकांचे नंडेला, जावेला, सासुबाई इत्यादी 'फराळ मेकर' टीम ला फोन चालू व्हायचे, मग फराळाला मदतील ये असा निरोप एकमेकींना मिळायचा. दसरा झाला रे झाला की पोरांच्या सहामाही संपायची, आणि मग एखादा शनिवारी-रविवारी घरातील कर्ते पुरुष स.कु.स.प 'खरेदी' नावाचा सोहळा पार पाडायला बाहेर पडायचे. बरीच दुकानं हिंडून, कैक तास रेंगाळत एकदाचे हवे तसे कपडे मिळाले, आणि मुलांसाठी फटाके घेतले की कुटुंबाच्या आग्रहाखातर हॉटेलातच रात्रीचे जेवण होई. मग दिवाळीच्या सुट्टीत पिस्तुल घेऊन लहानगे फटाके फोडायला चालू करीत. रोज संध्याकाळी फटाक्यांचे आवाज सर्रासपणे एकू येत. फोनवर ठरल्याप्रमाणे बायकांचा गोतावळा जमे, आणि चालू होई फराळाची तयारी. कुठे भाजणी भाजल्याचा वास, कुठे नारळ खवल्याचा आवाज, कुठे बेसन भाजतानाचा खमंग वास येई तर कुठे बायका सोर्यातून चकलीचे आकार पडताना दिसत. मग बायकांमध्ये तुझी चकली बिघडली का ? माझी बिघडली, माझ्या करंजीच्या सारणात साखरच कमी पडली तुझ्या पडली का ? वगेरे चर्चा ऐकू येत. तेव्हा 'रेडीमेड फराळाचे आयटम' हा प्रकार अस्तित्वात नव्हताच. मग डायरीतील नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र- मैत्रिणींना दिवाळीचे ग्रीटिंग पाठवण्यासाठी पत्ते काढले जायचे. मग बाहेरगावच्या लोकांना साधारण आठवडाभर आधी ग्रीटिंग, आणि ख्याली खुशाली विचारणारे पत्र पोस्टाने पाठवले जाई, त्याच बरोबर आलेले ग्रीटिंग पाहून एक विलक्षण समाधान चेहऱ्यावर झळकायचे. ती ग्रीटिंग वर्षानुवर्षे जतन केली जायची . घरातील नोकरदार पुरुषांना दिवाळीची विविध गिफ्ट्स मिळायची. त्याचं एक आगळंच कौतुक असायचं.
साधारण नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री लवकर जेवणं व्हायची., जेणेकरून लवकर झोपून पहाटे लवकर उठता येईल. साधारण पहाटे ३ च्या सुमारास उठून तयारीची लगबग चालू व्हायची. सुगंधी तेलाच्या वाट्या , आणि उटणी तयार असायची. मग घरातील पुरुष मंडळीना बायका तेल लावायच्या, आणि उटण आणि मोती साबणाने अभ्यंग स्नान व्हायचे. मग शास्त्राप्रमाणे देवाची पूजा करून फराळाचा नेवेद्य दाखवला जायचा. मग फराळाच्या विविध पदार्थांचे डबे बाहेर काढले जायचे, मग एका मोठ्या ताटात लाडू, चकल्या, करंज्या, अनारसे, शेव, चिवडा इत्यादी मांडले जायचे. मग अशी एखाद दोन ताट शेजारी पाजारी दिली जायची आणि त्यांच्याकडून पण एखाद दुसरे ताट यायचे. खाऊन झाल की फटक्यांची पिशवी आणि उदबत्ती घेऊन आबाल वृद्ध गच्चीत किवा मोकळ्या जागेत फटाके उडवायला जायची. पहाटेपासून फटक्याचा nonstop आवाज थेट दुपारपर्यंत असायचा. मग विशेष जेवण न करता तेच पदार्थ जेवताना खाल्ले जायचे. दुपारी वामकुक्षी झाल्यावर संध्याकाळची लक्ष्मीपूजनाची तयारी चालू व्हायची, संध्याकाळी ६.३० नंतर लक्ष्मीपूजन व्हायचे. नंतर परत संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फटक्यांची आतषबाजी असायची. रात्री आकाशात रॉकेट उडतानाचे दृश्य विहंगम वाटायचे.
आताच्या काळात हे टिपिकल schedulde बरेचसे बदलले आहे. विशेष fact म्हणजे पूर्वी फराळाचे पदार्थ दिवाळीला एकदाच केले जायचे आणि खाल्ले जायचे, हल्ली १२ महिने चकली चिवडा करंजी इत्यादी अगदी 'easily available' असल्याने वर्षभर खाल्ले जाते त्यामुळे त्याचे glamour नाहीसे झाले आहे. सध्या सर्वाना जाणवणारा एकच problem, तो म्हणजे वेळेचा अभाव, नोकरदार बायकांना फराळ करायला वेळ नसल्याने, रेडीमेड फराळाच्या उद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे मायेच्या हातच्या फराळाची चव चाखायला मिळत नाही. कपड्याची खरेदी पण एरवी वर्षभर होतच असल्याने, दिवाळीच्या खरेदीचे तितकेसे आकर्षण राहिलेले नाही. वाढत्या महागाईने जरा खरेदीला कात्री लागल्याचे स्वरूप पहावयास मिळते. 'दिवाळी पहाट' हा एक आगळाच कन्सेप्ट खासकरून मुंबई पुण्यात चालू झालेला दिसतो. डोंबिवली मध्ये दिवाळीच्या पहाटे 'फडके रोड' वर सगळी तरुणाई एकत्र जमते. सगळे मित्र मैत्रिणी, आप्तेष्ट जमून एकमेकांना शुभेच्छा देतात. हाच कित्ता ठाण्यात राम मारुती रोड, पुण्यात सारसबाग, दादरला पार्कात गिरवला जातो. परवा एक मजेदार किस्सा पाह्यला मिळाला, एक शाळकरी मुलगा त्याच्या मित्राला विचारत होता, की “अरे ते फडकेला जातात ना त्यादिवशी कुठला वार आहे?” हे जितक हास्यास्पद आहे तितक कीव करण्यासारखं आहे. पूर्वी खरेदी वर्षातून कधीतरीच होई, आणि दिवाळी त्यातील एक मुख्य निमित्त होते, हल्ली वर्षभर काहीना काहीतरी कपड्यांची खरेदी होतच असल्याने त्याचं पण नाविन्य राहिलेलं नाही. फटाक्यांच प्रमाण पण लक्षणीय कमी झालेले आहे ही एक चांगली बाब. अभ्यंग स्नाना मध्ये कृत्रिम creams, moisturizers, cosmetics ची भर पडली. SMS, Email मुळे ग्रीटिंग ची देवाण घेवाण कमी झाली. एका आनंदाच्या सणाचे बाजारीकरण झालेले आहे. कुठेतरी सणाचे धार्मिक महत्व लोप पावत असल्याचे चित्र दिसत आहे. सात्विकता कमी होऊन सणाचे भडक बाजारीकरण झालेले आहे. शेवटी काळानुसार enjoyment च्या ज्याच्या त्याच्या पिढीच्या कन्सेप्ट मध्ये फरक पडतोच म्हणा. चालायचंच ‘कालाय तस्मै नमः’ .म्हणायचं .